मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय पहिल्यांदाच नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो देणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरु आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालय, आरबीआय नोटांच्या मालिकेवर कलाम आणि टागोर यांचा वॉटरमार्क वापरण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, नोटांवर असा कुठलाही बदल केला जाणार नसल्याचं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
रिझर्व्ह बँकेत असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची प्रेस नोट आरबीआयने काढली आहे. चलनी नोटांवर आतापर्यंत महात्मा गांधी तटामुक्त यांचेच छायाचित्र पाहायला मिळत आहे. मात्र, आता लवकर नोटांवर अन्य महापुरुषांचे छायाचित्र पाहायला मिळू शकते, असा काही बातमी सध्या फिरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे स्पष्टीकरण दिलं आहे.
आरबीआय काही नोटांच्या मालिकेवर रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या छायाचित्राचा वापर करण्याच्या विचारात आहे. केंद्रीय अर्थ खाते आणि आरबीआय त्या दृष्टीने लवकरच पाऊल उचलण्याची शक्यता आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर आणि कलाम यांच्या वॉटरमार्क असलेल्या छायाचित्रांच्या नमुन्यांचे दोन वेगवेगळे सेट आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक दिलीप शाह यांना पाठवण्यात आले आहेत. दोन सेटपैकी एक सेट नक्की करुन तो सरकारसमोर सादर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाणार असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.