कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला. सहा जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपनं तीन जागांवर विजय मिळवला.
तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. सहाव्या जागेसाठी शिवेसना आणि भाजपनं उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. मोठ्या विजयानंतर धनंजय महाडिक आज कोल्हापूरला पोहोचले. त्यावेळी कराडमध्ये माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महाडिकांची भेट झाली. त्यावेळी महाडिक यांनी शेट्टींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार @rajushetti यांनी कराड येथे स्वागतपर सत्कार केला. विजयश्री संपादन केल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. त्यांनी केलेल्या प्रेमपूर्ण सत्काराबद्दल त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार! pic.twitter.com/A9mNNnoPS6
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) June 12, 2022
धनंजय महाडिक पुण्याहून आज कोल्हापूरच्या दिशेनं निघाले. त्यावेळी कराडमध्ये रस्त्यात राजू शेट्टी आणि महाडिकांची भेट झाली. त्यावेळी महाडिक यांनी राजू शेट्टी यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी शेट्टींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत आणि हात हातात घेत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दोघांमध्ये काहीवेळ चर्चाही झाली. तसंच दोघांमध्ये हास्यविनोदही रंगले.
राजसभा निवडणुकीतील विजयानंतर धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी कुटुंबिय, भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांकडून महाडिकांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करण्यात आली. कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांना खांद्यावर घेत डान्स केला. बऱ्याच कालावधीनंतर महाडिक कुटुंबात विजयोस्तव साजरा होत असल्यामुळे कोल्हापुरात महाडिक समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.