मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकींसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन खोत यांना टोला लगावला. फडणवीसांनी खोत यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचा शाब्दिक चिमटा मिटकरींनी काढला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सावध झाले आहेत. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. पण अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील, हे स्पष्ट झालं आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.



