मुंबई : देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या प्रकरणावरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळेस त्यांनी मोदींनी अजित पवारांना भाषण करण्यास सांगितल्याबद्दल कौतुकही केलं आहे.
देहूमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.



