पुणे, 16 जून : झाडाच्या फांद्या तोडणं दोन जणांच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोसायटी कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी बारामतीत दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निसर्गप्रेमी आहेत. अजित पवारांचे झाडांवर प्रचंड प्रेम आहे. झाडे लावण्याचा तसेच निसर्ग जपण्याचा सल्लाही ते अनेकदा देत असतात. आपल्या भाषणातही अनेकदा याबाबत नागरिकांना, कार्यकर्त्यांना सल्ला देताना दिसून येतात. मात्र, अजित पवारांचं हे वृक्षप्रेम काहींजण विसरले आणि आता त्याचा फटका त्यांना बसला आहे.
अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यामुळे 2 जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष वाबळे यांनी वृक्षांच्या फांद्यांची तोड केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.