नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे देशातल्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष चर्चा, बैठका, संख्याबळाची जुळणी, व्यूहरचना आखणं आदी गोष्टींवर भर देत आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा विचार करता एनडीए बहुमताच्या जवळ असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षदेखील आपली स्थिती मजबूत असल्याचं सांगत आहेत.
परंतु, वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. या दोघांकडेही पुरेसं बहुमत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक यूपीए (UPA) आणि एनडीएसाठी सोपी नाही. त्यामुळे दोघांकडूनही छोट्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर आणि जगनमोहन रेड्डी या तीन जणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हे तिघं नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या तिघांच्या भूमिकेवरच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची सर्व गणितं अवलंबून आहेत.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 29 जूनला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 18 जुलैला मतदान होणार असून, 21 जुलैला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एनडीए आणि यूपीए संख्याबळाचं गणित जुळवण्यात व्यग्र आहेत. परंतु, एकूण स्थिती पाहता या दोघांसाठीही ही निवडणूक सोपी नक्कीच नाही. त्यात जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक आणि केसीआर काय भूमिका घेतात यावर संपूर्ण निवडणुकीचं गणित अवलंबून असेल. एनडीएला बहुमतासाठी 13 हजार मतांची गरज आहे. त्यामुळे रेड्डी किंवा पटनायक या दोघांपैकी एकाचा पाठिंबा एनडीएला मिळाला, तर ते विजयी होऊ शकतात. 2017 मध्ये या दोघांनी एनडीएला पाठिंबा दिला होता.