मुंबईः केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ या सैन्य भरती योजनेविरुद्ध देशभरात आंदोलनं सुरु आहेत. मात्र आंदोलन करणारा तरुण हा सामान्य आहे. त्यांना विरोधकांकडून भडकवलं जात आहे. तरुणांनी आंदोलनं करुन अनेक केसेस अंगावर घेतात. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावं की अशा केसेस तुमच्या नावावर असतील तर कुठेही नोकऱ्या मिळणार नाही. ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
अग्नीपथ योजनेच्या अनुशंगाने काही सूचना आणि त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न करता थेट आंदोलन करणं, रेल्वे जाळणं चुकीचं असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी नोंदवलं. केंद्रसरकारने 4 वर्षांच्या कंत्राटावर सैन्यभरती करण्याची अग्नीपथ नावाची योजना नुकतीच जाहीर केली आहे. मात्र एवढ्या कमी कालावधीसाठी भरती करण्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
अग्नीपथ योजनेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आंदोलनं अनेक होतात. पण काहीही मागण्या पुढे न करता थेट रेल्वे जाळणं असे प्रकार झाले. याचा अर्थ सामान्य युवक हा धाडस करत नाही. यातून केसेस दाखल झाल्या तर त्याचे नोकरीचे सर्व मार्गच बंद होतात. त्यामुळे आंदोलनातला हा सामान्य तरुण नाही. त्यामुळे अग्नीपथ योजना काय आहे, हे तरुणांनी आधी समजून घ्यावं. ती मान्य नसेल तर शांततामय मार्गाने चर्चा केली पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहात. तुमच्यावर केसेस दाखल होतील. कुठलीही नोकरी मिळणार नाही. मी भीती दाखवत नाही. मीही चळवळीत काम केलेलं आहे.



