पुणे : : जुन्नर तालुक्यातील एका व्यावसायिकाला संतोष जाधव याने व्हाॅटसॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी दिली नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी संतोष जाधव याला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदरची माहिती व्यावसायिकाने दिली असून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष जाधव याच्या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १३ पिस्तुले, मोबाईल जप्त केले आहेत. जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय २३, रा. मंचर, श्रीराम रमेश थोरात (वय ३२, रा. मंचर), जयेश रतिलाल बहिराम (वय २४, रा. घोडेगाव), वैभव ऊफर् भोला शांताराम तिटकारे (वय १९, रा. जळकेवाडी, चिखली), रोहीत विठ्ठल तिटकारे (वय २५, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे (वय २२, रा. धाबेवाडी, नायफड), जिशान इलाई बक्श मुंढे (वय २०, रा. घोडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जयेश बहिराम (५ गावठी पिस्तुल, १ मोबाई), रोहीत तिटकारे (३ पिस्तुल, १ मॅक्झीन, १ बुलेट कॅरयर), व इतरांकडून प्रत्येकी एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके उपस्थित होते. संतोष जाधव याने ५ ते ६ महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला व्हॉटसॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हप्ता दिला नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी संतोष जाधव याने पुन्हा एकदा कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र घाबरुन त्यांनी कोठेही वाच्यता केली नव्हती. पोलिसांनी संतोषला पकडण्यावर त्यांनी ही माहिती सांगितली.



