मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. पराभवनानंतर बोलताना संजय राऊत यांनी बविआचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचं नाव घेतले. त्यात नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचंही नाव राऊत यांनी घेतलं होतं. आता उद्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. अशावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली.
‘त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका आहे. मी संजय राऊतांशी संपर्क केला नाही. मी त्यांना भेटणार नाही. मी राष्ट्रवादीचा सहयोगी आमदार आहे. आज महत्व वाढलं हे नक्की आहे. शिवसेनेनं मला विचारलं तर मी सांगेन काय नाराजी आहे ते. जे आरोप केले ते परत परत सांगायची गरज नाही. ते गुप्त मतदान होतं त्यामुळे कुणी कुणाला मत दिलं ते कुणी सांगू शकणार नाही. आता विधान परिषदेत विजय कुणाचा होणार हे मी सांगू शकत नाही. मी काही भविष्य सांगणारा नाही अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.



