मुंबई: विधान परिषद निवडणुकीला अवघे काही तास बाकी असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे हे सक्रिय झाले आहेत. खडसे यांनी आज मतदानासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली.
बंद दाराआड झालेल्या या चर्चेचा तपशील उघड झाला नाही. मात्र, खडसे यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. तर, खडसे यांनी आज भाजपच्या काही आमदारांना फोन केल्याचं वृत्त आहे. एवढ्यावेळी तुम्हाला मला मदत करावीच लागेल, असं खडसे या आमदारांना फोनवर बोलल्याचं सांगितलं जात आहे.
खडसे यांनी भाजपमध्ये असताना अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली होती. त्यामुळे त्यांनी आता या आमदारांकडे मते मागितली आहेत. विशेष म्हणजे यावेळी गुप्त मतदान आहे. त्यामुळे हे आमदार खडसेंच्या विनंतीला मान देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



