राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांची नाराज असल्याने राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. पक्षाचे इतर सर्व आमदार मुंबईत पोहोचले असतानाही आमदार मोहिते मात्र अजूनही पक्षाच्या आमदारांसोबत दाखल झालेले नव्हते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोहिते कोणता पवित्रा घेणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, विधान परिषदेसाठीच्या मतदानाबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही, असा खुलासा दिलीप मोहिते यांनी केला आहे.
ते म्हणाले, तिथे गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांना भेटून निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. पंरतु त्यानंतरही कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.पुढे ते म्हणाले, राज्यसभेनंतर चित्र पालटेल असं वाटलं होतं. पण काहीही बदल झालेले नाहीत. हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र बाकी आमचा सवतासुभा अशी यांची कृती आहे.
सत्तेच्या प्रमुखांनी विचार करून न्याय द्यावा. मतदान करणार का ते ठरवण्यासाठी अजूनही वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी आमदार मोहिते यांनी माध्यमांसमोर येत आपल्या मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांचा रोख अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे होता. आपली कामे होत नाहीत, गेली दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही खेड तालुक्यातील प्रशासकीय इमारत, पोलिस ठाणे आणि पंचायत समितीची इमारतीचे काम होत नसल्याची खंत व्यक्त केली होती.



