अमरावती : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आणले आहे. अशावेळी शिवसेना-भाजपची युती होऊ शकते. असं झालं तर रवी राणा यांना मंत्रीपदही मिळू शकते. पण, या सर्व शक्यता आहेत. सध्यातरी काही सांगता येत नाही. तरीही राणा यांच्या कार्यकर्त्यांना रवी राणा यांना मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर कॅबिनेट मंत्रीपदाचे व पालकमंत्री पदाचे पोस्टर्स लावले आहेत.
मराठीत एक म्हण आहे, उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, अशी काहीसी परिस्थिती आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत दिसत आहे. अद्याप ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कायम आहे. भाजपचे सरकार आले नाही. तरीही काही उत्साही कार्यकर्ते राणा यांना मंत्रीपद मिळाल्यासारखे वागत आहेत.
बाळू इंगोले पाटील या कार्यकर्त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यानुसार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री रवीभाऊ राणा यांचे मनःपूर्वक अभिनंदन अशाप्रकारची पोस्ट टाकली आहे. राणा हे मंत्री झालेले नाहीत. त्यामुळं ते अमरावतीचे पालकमंत्रीही नाहीत. पण, ते लवकरच मंत्री व्हावेत. पालकमंत्री व्हावेत, यासाठी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी गुडघ्याला जणू बाशिंग लावले आहे. त्यांना राणा यांना मंत्री, पालकमंत्री म्हणून पाहायचे आहे. त्यासाठी त्यांना अतिशय घाई झाली आहे.



