मुंबई : राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यामधील महाविकास आघाडी सरकार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बंडामागे भाजपा असल्याचे आरोप शिवसेनेकडून केले जात आहेत. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी या बंडामागे भाजपा आहे का? यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांना मागील दोन दिवसांमध्ये ४६ आमदारांनी समर्थन दर्शवलं आहे. शिंदे हे मंगळवारी काही बंडखोर आमदारांसोबत सुरत नंतर गुवहाटीमध्ये दाखल झाले. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठकी पार पडल्यानंतर सायंकाळी शरद पवारांनी यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्राकारांशी बोलताना अजित पवारांना या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अजून तरी तसं काही दिसलं नाही,” असं म्हटलं आहे.



