पुणे : तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत आणि त्यांच्यासमवेत खच्चून गर्दीतही वासुदेवाची टोपी डोक्यावर घेत सेल्फी घेण्याचा मोह महिलांना आवरता आला नाही. आषाढीवारीचा देखणा सोहळा मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आबालवृद्धांची चढाओढ पाहायला मिळाली. गर्दीची तमा न बाळगता चिमुकल्यांनी विठू माऊलीची पालखी वारकरी भक्तांचे आकर्षण ठरली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अलोट गर्दी लोटली. खच्चून गर्दीमध्ये माऊलींचे दर्शन घेतल्याचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. स्पीकर, गर्दी, गोंगाट तरीही मोबाईलवर सेल्फी काढत संवाद साधण्याचे थांबले नाही, हे पाहून मोबाईलवेड्यांचे वैष्णवांनी अभिनंदनच केले.
आषाढीवारी पंढरीकडे निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी रात्री उशिरा दाखल झाल्या. तेव्हापासून पुणेकरांनी दर्शन घेण्यासाठी एकच धाव घेतली आहे. आज (गुरुवारी) भल्या सकाळपासून भाविकांनी चिमुकल्यांना घेऊन दर्शनाचा लाभ घेतला. वैष्णव भक्तांना पुणेकरांनी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली असून, मंडळांचे कार्यकर्तेही त्या कामात तल्लीन झाले आहेत.




