मुंबई ; शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड करणारे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केलंय. शिंदेंसोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष ९ असे एकूण ४८ आमदार आहेत. या आमदारांना सुरतमार्गे गुवाहाटीत नेण्यात येत असून रॅडिसन ब्लू या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आलं आहे. या ‘बंडवीरां’चा दिवसाचा राहण्याचा आणि जेवण्याचा खर्च किती, प्रवासाचा खर्च किती हे जाणून घेऊया…
विमानप्रवासाचा खर्च?एव्हिएशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरतला चार्टर्ड फ्लाईट नसतात. या फ्लाईट मुंबई, पुणे किंवा अहमदाबादवरुन सुरतला जातात. चार्टर्ड फ्लाईटच्या परतीच्या प्रवासाचा खर्चही द्यावा लागतो.सहा आसनी चार्टर्ड फ्लाईटसाठी किमान १५ ते १६ लाख खर्च अपेक्षित आहे.आठ आसनी चार्टर्ड फ्लाईटसाठी किमान २६ ते २८ लाख खर्च अपेक्षित आहे.
राहण्याचा आणि खाण्याचा खर्च किती?रॅडिसन ब्लूमधील एका खोलीचे भाडे प्रतिदिवसाचे भाडे हे किमान पाच ते सहा हजार रुपये आहे. सकाळी आणि रात्रीच्या जेवणासाठी किमान तीन ते चार हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच एका आमदाराचा राहण्याचा आणि जेवणाचा एका दिवसाचा खर्च हा नऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत जातोय. सध्या या हॉटेलमध्ये ४८ आमदार आहेत. यानुसार एका दिवसाचा खर्च हा ४ लाख ३२ हजार रुपये ते चार लाख ८० हजार रुपयांपर्यंत आहे. याशिवाय आमदारांसोबत आलेले त्यांची खासगी सचिव, निकटवर्तीय, प्रसिद्धीप्रमुख अन्य कर्मचारी याचा खर्च वेगळा. (या बातमीतील खर्चाची रक्कम ही किमान धरली आहे. Makemytrip अशा साईटवर किमान भाडे असलेल्या खोलीचे दर काय आहे हे तपासून हा आकडा काढण्यात आला आहे.)



