मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या शासन आदेशांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपाने केली आहे. मात्र भाजपाने यासंदर्भात राज्यपालांना पत्रा पाठवून विनंती केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. राज्यामध्ये बहुमताचं सरकार असून सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं अजित पवारांनी भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाने पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे शिंदे बंड प्रकरणात उडी घेत राज्यपालांना महाविकास आघाडीच्या शासन आदेशांच्या धडाक्याविरोधात पत्र पाठवलं.
प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पक्षाच्यावतीने हे पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये भाजपाने महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव असल्याचं म्हटलंय. ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी भाजपाने केली आहे.



