उल्हासनगर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर शहरातील त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयावर शनिवारी काही शिवसैनिकांनी हल्ला करत कार्यालयाची मोडतोड केली होती. याप्रकरणी उल्हासनगरातील शाखाप्रमुख आणि एका युवा सेना शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश पाटील (47, टिळकनगर शाखा प्रमुख), नितीन बोथ (27, वाल्मिकीनगर शाखा प्रमुख), उमेश पवार (41, झुलेलाल चौक, शाखा प्रमुख), संतोष कणसे (39, फक्कडमंडी, शाखा प्रमुख), लतेश पाटील (25 शाखा प्रमुख) आणि बाळा भगुरे (युवासेना पदाधिकारी ) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोन दिवसांनंतर मुंबई आणि राज्यातील काही ठिकाणी बंडखोर आमदारांविरूद्ध स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यात बंडखोर आमदारांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया….
सुरूवातीला समाज माध्यमांवरून सुरू असलेला पाठिंबा आणि विरोधाचा खेळ शुक्रवारपासून हल्ल्यामध्ये रूपांतरीत झाला. मुंबई, कोकण आणि राज्यात बंडखोर आमदारांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाणे जिल्ह्यात मात्र कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र शनिवारी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात आणि त्यांचेच पुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला. यावेळी दगडांनी कार्यालयाच्या मुख्य फलक तोडण्यात आले. तेथे हजर असलेल्या पोलिसांनी तात्काळ या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आणि याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात शनिवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


