ठाणे : शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानं त्यांचे समर्थकही राजीनामा देत असल्याचं चित्र राज्यभरात दिसतंय. तर बंडखोर गटाचं समर्थन करणाऱ्यांचा राजीनामा घेतला जात असल्याचा प्रकार ठाण्यातून समोर आलाय. यावर शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे पक्षातून काढत रहाल तर ठाण्यात शिवसेनेच्या कार्यालयांना कुलूप लावायला शिवसेनेकडे माणूस शिल्लक राहणार नाही, असं शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या मीनाक्षी शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेतील नाराजी वाढत असून पालिकास्तरावर देखील नाराजी पसरल्याचं दिसतंय. तर हेच चित्र राज्यातही असून अनेक ठिकाणी बंडखोरांच्या समर्थनार्थ मोर्चे देखील निघाले आहेत. यामुळे शिंदे समर्थक आणि शिवसेना यांच्यातील दुफळी वाढत आहे.
पक्ष संपवायचाय का?….
शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलंय की, शिवसेनेतील नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी करणार आहेत, असा सवाल उपस्थित करत पक्षातून कार्यकर्त्यांना काढण्याचं सत्र असंच सुरु राहिलं तर शिवसेना शाखांना टाळं लावायला माणूस उरणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे



