एकनाथ शिंदे यांच्यासह 39 शिवसेना आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री अब्दुल सत्तार यासर्वांमध्ये अधिक चर्चेत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बंडखोरी करण्यासाठी किती पैसे घेतले असे विचारणाऱ्या तरुणाला सत्तार यांनी फोनवरून थेट शिवीगाळ करत असल्याचे या ऑडिओ क्लिपमुळे पाहायला मिळत आहे.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये…
फारीस कादरी नावाच्या एका तरुणाने अब्दुल सत्तार यांना फोन करून आधी कसे आहात असं विचारले. त्यांनतर आता कुठे आहात असे म्हणताच सत्तार यांनी गोव्यात असल्याचे सांगितले. पुढे या तरुणाने चांगली जोरात पार्टी सुरु आहे वाटते, भाजपकडून किती पैसे घेतले असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी या तरुणाला थेट शिवीगाळ करायला सुरवात केली. या सर्व संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल झालेल्या या क्लिपची सत्यता महाराष्ट्र माझाने पडताळून पाहिलेली नाही.
अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार…
कधीकाळी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या अब्दुल सत्तार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हातात शिवबंधन बांधले. त्यांनतर राज्यात महाविकास आघाडीची सरकार सत्ता आली आणि सत्तार यांना महसूल राज्यमंत्री पदाची जवाबदारी मिळाली. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले. पण शिंदे यांच्या गटात आघाडीवर असलेल्या अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांना राज्यमंत्रीपदाच्या जागी आता कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते, असेही बोलले जात आहे.



