मी जवळपास २००४ पासून एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून पाहिलं आहे. पण २००४ ते २०२२ पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं. मन दुखावलं गेलं की जिवाला लागतं असं सांगत त्यांनी एकनाथ शिदेंच्या मनमोकळ्या भाषणाचं कौतुक केलं.
एकनाथ शिंदे यांचे २००४ ते २०२२ पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं. मी तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होतो. सोबत फडणवीसांचा चेहराही पाहत होतो. ते बास झालं, आता थांबा असं सारखं सांगत होते. पण शिंदे साहेबांची गाडी सुसाट सुटली होती, बुलेट ट्रेनच होती. ते काही थांबायला तयार नव्हते आणि फडणवीसांना एखादा शब्द निघायचा अशी भीती वाटत होती.
जसं मी सांगितलं की, टाळ्या मिळू लागल्या की वक्ता घसरतो आणि त्यालाच कधी काय बोलून गेलो कळत नाही. तसं काही मुख्यमंत्र्यांचं पहिल्याच भाषणात होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एवढी काळजी घेत होते. मागे दीपक केसरकरांचा जीव पण तुटत होता. गुलाबराव पण नंतर काय ठरलं ते सगळं सांगू नका सांगत होते असं अजित पवार मिश्कीलपणे सांगत होते.



