पुणे – मागील ३६ तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील ‘येवा’ (पाणी जमा होणे) हा प्रति सेकंद १३ हजार क्युसेक झाला आहे. पाण्याचा ‘येव्या’ची हीच गती कायम राहिल्यास, रात्री बारा वाजेपर्यंत खडकवासला धरण हे ९० टक्के भरणार आहे. दरम्यान, यामुळे हे धरण उद्या (मंगळवारी) सकाळपर्यंत पूर्ण भरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
खडकवासला धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण ९० टक्के भरताच, एक हजार क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यामुळे मध्यरात्री बारा वाजल्यानंतर केव्हाही या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सांगितले.
सध्याही खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र हे २० किलोमीटर इतके आहे. यामुळे या धरणाचा ‘येवा’ वाढला आहे. दरम्यान, खडकवासला धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जाणार असला तरी, पानशेत, वरसगाव या धरणांतील पाण्याचा विसर्ग केला जाणार नसल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. खडकवासला धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही १.९५ टीएमसी इतकी आहे. सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत हे धरण ८३ टक्के भरले आहे.
‘येवा’ म्हणजे काय ?
कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सर्व मार्गांनी धरणात जमा होणाऱ्या एकूण पाण्याला ‘येवा’ असे म्हणतात. थोडक्यात ‘येवा’ म्हणजे धरणात जमा होणारे पाणी म्हणता येईल. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार ‘येवा’ निश्चित केला जातो.




