डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक तथा कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी चार ते पाच जणांनी तलवार, रॉड सारख्या हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालांडे हे ठाकरे समर्थक असून त्यांनी शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले असून हल्ला झाला हे दुर्दैवी मात्र, माझा यात काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कोळसेवाडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. ठाकरे समर्थक शिवसैनिकावर हल्ला झाल्याने कल्याण डोंबिवलीत खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.
हर्षवर्धन पलांडे हे बुधवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामास जाण्यासाठी निघाले होते. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर ते थांबले असता तेथे एक गाडी आली. पालांडे यांच्या समोर वाहन उभे करून पालांडे यांनी काही कळण्याच्या आत चार ते पाच जणांनी पलांडे यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण जरण्यास सुरवात केली. काहींनी पालांडे यांच्यावर तलवार, चॅापरने वार केले. मारहाण केल्यानंतर मारेकरी पळून गेले.
पालांडे यांना मारहाण झाल्याचे समजताच कल्याण मधील ठाकरे समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोळसेवाडी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. हर्षवर्धन पालांडे यांनी आपण ठाकरे समर्थक आहोत. शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे सांगितले. शिवसेनेत खूप पुढे पुढे होऊन काम करत आहेस, असे मारेकरी म्हणत असल्याचे पलांडे यांनी सांगितले.
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पालांडे यांचा आरोप फेटाळला आहे. हल्ला झाला हे दुर्दैवी मात्र, माझा काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी तपास करत कारवाई करावी. माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यां विरोधात न्यायालयात दावा दाखल करू, असा इशारा देखील दिला आहे.
शिंदे गटाकडून पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी; पुण्यात लवकरच मेळावा !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कल्याण पूर्वेतील बहुतांशी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. पालांडे यांनी आपण निष्ठावान शिवसैनिक असल्याने ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचा निर्णय घेतला. ही मारहाण म्हणजे दबाव तंत्राचा भाग असण्याची शक्यता ठाकरे समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



