मुंबई, पुणे, औरंगाबादसह अनेक महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी सर्व निवडणूक लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाच्या बाबतीत पहिली प्राथमिक बैठक सुद्धा पार पडली आहे.
शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र जागावाटपाचा अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. त्याबाबत पुढील काळात आणखी काही बैठका होणार असून , त्यांनतर अंतिम निर्णय होणार आहे. जागावाटपाबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. औरंगाबादमधील अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हिंदुत्वासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा हिंदुत्ववाचा असणार असल्याचं जंजाळ यांनी स्पष्ट केलं.औरंगाबादमधील सर्वच्या सर्व सहा शिवसेना आमदार फुटून शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आधीच खिळखिळी झाली आहे. त्यातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणुकांना सामोरा गेल्यास उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाली शिवसेनेची कोंडी होऊ शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



