सोलापूर – शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना पदावरून पायउतार व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे ‘निष्ठा यात्रे’च्या माध्यमातून बंडखोर आमदार, खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी व जनतेशी संवाद साधत आहेत. सातारा, कोल्हापूर दौऱ्यानंतर ते सांगोला, परंड्यातही येणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या मदतीने काही पदाधिकारीही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभर निष्ठा यात्रेतून विशेषत: ४० आमदार आणि १२ खासदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. आता ते कोल्हापूर व साताऱ्यात जाणार आहेत.
त्यानंतर ते ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ म्हणत देशभर चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात येणार आहेत. त्यानंतर ते माजी मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या परंडा मतदारसंघात सुद्धा जाणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले सावंत हे शिंदे गटातील प्रमुख आमदार आहेत.



