मुंबई- मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजता ईडीची टीम राऊत यांच्या घरी पोहचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यानंतर ईडीने (ED) त्यांना मुंबईच्या फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात आणले. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. या छापेमारीच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे.
- दहा लाखांच्या बंडलावर लिहिले आहे ‘एकनाथ शिंदे अयोध्या’
दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिलेले आहे. अशी माहिती मिळते आहे. हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे. उरलेले दीड लाख रुपये हे घरातील खर्चासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे पैसे ईडीने जप्त केले आहेत. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांना ईडी कार्यालयात आणल्यानंतर त्यांनीच स्वताच्या अटकेचे संकेत दिले होते. रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. ईडी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर, ‘ते मला अटक करणार आहेत आणि मी अटक करवून घेणार आहे’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.



