पुणे : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू असताना आज (मंगळवारी) पुण्यातील या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्या यात गाडीची काच फुटली असल्याची माहिती समोर आली आहे.
गद्दार-गद्दार असं म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या गाडीच्या ताफ्यावर हल्ला केला. दरम्यान कात्रज भागात आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना ट्राफिक खोळबंली होती, यादरम्यान शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.



