सोलापूर : सेनेतील बंडाळीने तापलेला माहोल अजूनही शांत व्हायचं नाव घेत नाही. काल रात्री पुण्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून जबरदस्त हल्ला चढवत गाडी फोडली. त्यानंतर सामंत यांनी कोथरूड पोलिसात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली.
त्यानंतर यावर दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या या शिवसैनिकांच्या भावना आहेत, अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेते देऊ लागले. तर हा पाठीत वार आहे, अशा प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांकडून येऊ लागल्या. मात्र यावेळी बोलता बोलता एका शिवसैनिकाने सांगितलं की आम्हाला तानाजी सावंत यांना आडवायचं होतं, मात्र गाडीत उदय सामंत निघाले, त्यानंतर आता सोलापुरातल्या शिवसैनिकांनीही तानाजी सावंत यांच्याबाबत अशाच आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि सणसणीत इशाराही दिला आहे.
- ठोकल्याशिवाय राहणार नाही….
पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत आहे. त्याची पाच हजार कोटीची संपत्ती आहे. त्यावर ईडी कारवाई का करत नाही. ज्या तानाजी सावंताला पक्षप्रमुखांनी विधान परिषदेवर आमदार केले, मंत्री केले, तो सावंत विचारतो की, कोण आदित्य ठाकरे? या तानाजी सावंताला सोलापुरातील शिवसैनिक चप्पलने मारल्याशिवाय राहणार नाही, तीवरे धरण हे खेकड्यांनी फोडलं असं म्हणणारा तानाजी सावंत याला फक्त पैशाची मस्ती आहे, अशी घणाघाती टीका यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.



