पुणे, ५ ऑगस्ट : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात आता दोषींना मोठा धक्का बसला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांना आता बेकायदेशीर ठरवले आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
आरोग्य भरती परीक्षेतील गैरप्रकारांचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला होता. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.



