मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनावर होत आह़े. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आह़े. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, बच्चू कडू आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला होता. तेव्हापासून गेले सव्वा-दीड महिना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. शिंदे सरकारची वैधता, अध्यक्षांची निवड आणि आमदार अपात्रतेच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिका प्रलंबित आहेत. दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे प्रलंबित आहे. त्यामुळे हा विस्तार रखडल्याची चर्चा सुरू होती.



