मुंबई : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.
- ते टाळलं असतं तर बरं झालं असतं ; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
शिंदे-फडणवीस सरकारचा आज अखेर मंत्रीमंडळ विस्तार झाला. यावेळी विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी या मंत्रीमंडळ विस्तारावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या नेत्यांवर आरोप झाले आणि ज्यांना अद्याप क्लीन चिट मिळाली नाही त्यांना टाळलं असतं तर बरं झालं असतं,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.



