मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर तब्बल ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळात असणाऱ्या सदस्यांऐवजी जे मंत्रिमंडळात नाही अशा आमदारांना अच्छे दिवस आल्याचं अमोल मिटकरींनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आजच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. याच मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना मिटकरींनी शिंदे सरकारचा उल्लेख ‘ओढून तोडून स्थापन केलेलं औट घटकेचं सरकार’ असा केला आहे.



