मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुन्या सरकारचे निर्णय बदलण्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल होताना दिसून येत आहेत. यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ठाकरे सरकारच्या काळात मेट्रो-३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी मिठागर असल्याचे सांगत विकासक गरुडिया यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार आणि एमएमआरडीए (MMRDA) या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करत असल्याचा दावा गरुडिया यांनी न्यायालयात केला होता.
मात्र, आता राज्यातील सरकार बदलताच गरुडिया यांनी कांजूर कारशेडविरोधातील लढाईतून माघार घेतली आहे. त्यांनी न्यायालयात दाखल असलेली आपली याचिका मागे घेतली आहे. राज्यात सत्तांतर होताच गरुडिया यांना अचानक असा कोणता साक्षात्कार झाला की, त्यांनी ही याचिकाच मागे घेतली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ठाकरे सरकारच्या काळात आरे परिसराऐवजी कांजूर मार्ग येथील पडीक जागा मेट्रो-३च्या कारशेडसाठी निश्चित करण्यात आली होती. त्यादृष्टीने ठाकरे सरकारने पुढील पावलेही टाकली होती. परंतु, बांधकाम व्यवसायिक असलेल्या गरुडिया यांनी यावर आक्षेप घेतला होता. ही जाग मिठागरच्या मालकीची असल्याचे त्यांचे म्हणणे होते. याविरोधात गरुडिया यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये नागरी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून हा सगळा वाद सुरु होता. या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये चांगलाच संघर्ष रंगला होता.



