मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले. मेटे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. अनेक राजकीय नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत विनायक मेटे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले.
विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्यासाठी आलेल्या सदावर्ते यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेरले. “सदावर्ते गो बॅक” अशा घोषणा देत धक्काबुक्की केली. पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप करत सदावर्ते यांना तेथून बाहेर काढले. मराठा आरक्षणाबाबत कायम विरोधाची भूमिका सदावर्ते यांनी न्यायालयात घेतल्याने आज कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
सदावर्ते यांच्या येण्याने येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली. सदावर्ते यांनी कायम मेटे यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच ते काळे कपडे घालून मुद्दाहून अत्यंदर्शनासाठी आले, असा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला.



