नाशिक : खाते वाटपात भाजपकडे जास्त खाती गेल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ज्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाली आहेत. ते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. शिवसेने विरोधात बंड केल्यानंतर नव्या सरकारमध्ये चांगलं खातं मिळेल असं या मंत्र्यांना वाटत होतं. पण झालं उलटंच. उलट काही मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाली तर काहींना आहे त्याच खात्यावर समाधान मानावे लागले आहे.
शिवाय शिंदे गटापेक्षा भाजपकडे अधिक महत्त्वाची आणि मलाईदार खाती गेली आहेत. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटाकडूनही सारवासारव सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी खाते वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांना चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीच म्हणाला होतात ना, आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता रडता कशाला? असा सवालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला करून शिंदे गटाच्या मंत्र्यांना डिवचले आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्यांचं पुनर्वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करून दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री आहेत. मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता?, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.



