मुंबईः शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करताना काही संशयास्पद गोष्टी आहेत का, याची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी सवाल उपस्थित केले गेले. त्यानंतर पोलिसांकडून मेटे यांच्या कारच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले होते. रायगड पोलिसांनी ड्रायव्हर एकनाथ कदम याची चौकशी केली.
मात्र यात त्याने समाधानकारक उत्तरे दिले नसल्याचे आढळून आले आहे. टीव्ही9 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता विनायक मेटेंचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड या दोघांचेही फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. ज्या आयशरने मेटेंच्या गाडीला धडक दिली, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही ड्रायव्हरची समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे. 14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे हे बीडकडून मुंबईकडे जात असताना पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.
समाधानकारक उत्तरं नाहीत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या ड्रायव्हरनी पोलिसांच्या तपासाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. प्रवासादरम्यान, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि विनायक मेटे यांना कुणाचे फोन आले होते, याचाही तपास पोलीस करणार आहेत. मेटे यांच्या कॉल्सचा डाटा पोलीस तपासणार आहेत. तसेच घटनेच्या वेळी ये-जा करणाऱ्या गाड्यांचाही तपास केला जाईल, अशी माहिती हाती आली आहे.



