मुंबई : राज्यातील उच्चपदस्थ असणाऱ्या काही उच्च व्यक्तीच्या भूमिका संशयाच्या घेऱ्यात असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल असताना अतिशय चोख कामगिरी बजावली. कोणत्याही राजकारणात त्या अडकल्या नाहीत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रपतींचं कौतुक करतानाच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अनुमोदन दिले. यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी अभिनंदन केले.
अजित पवारांचा निशाणा भगतसिंह कोश्यारींवर?
विधानसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना अजित पवारांनी राज्यपालांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. ते म्हणाले, ‘ द्रौपदी मुर्मू यांनी २०१५ रोजी झारखंड राज्याचं राज्यपाल पद हातात घेतलं. त्या पहिल्या अशा राज्यपाल होत्या की त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरदेखील पदावरून हटवण्यात आलं नव्हतं. मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखलं जातं. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर होता आणि आहे. आज अनेक राज्यपालांच्या भूमिकेवर संशय, शंका, वाद निर्माण होताना आपण पाहतो. पण मुर्मू या राज्यपाल पदाच्या कारकीर्दीत राजकीय वादातून दूर राहिल्या. राज्यपाल पदाच्या कारकीर्दीत त्यांनी घेतलेल्या काही भूमिकाही चर्चेत राहिल्या.



