मुंबई : राज्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानावर बोलताना अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे गेलेल्या कृषीमंत्रिपदावरून खोचक टोला लगावला. अब्दुल सत्तार, तुमच्याकडे कृषी मंत्रालय आलंय. त्यामुळे मी तर आश्चर्यचकितच झालो. दादा भुसे फार बारकाईने बघत होते. का त्यांच्यावर अन्याय केला गेला मला माहिती नाही. मी तेव्हा बघायचो की दादा भुसे खरंच काम चांगलं करत होते. जे चांगलंय, त्याला मी चांगलंच म्हणणार, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
- ४० आमदारांसाठी वेगळं ऑफिसच उघडलंय
अजित पवार अतिवृष्टीवर भाषण करताना समोरच्या बाकावरून शिंदे गटातील काही आमदार बसून बोलत होते. यावरून अजित पवारांनी त्यांना देखील टोला लगावला. “थांबा, तुम्ही ४० आमदार कुठं जाणार नाहीत. तुमचीच कामं करणार आहेत. जरा गप्प बसा. एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकू द्या. तुमच्यासाठी तर तिकडे खास वेगळं ऑफिसच उघडलं आहे. काळजीच करू नका. तुम्हाला ४० लोकांना तर फार सांभाळायचं आहे”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.



