मुंबई : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली.
मृत व जखमी गोविंदांसाठी अर्थिक मदत….
गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास, त्याच्या कायदेशीर वारसास १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडून दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही दोन महत्त्वाचे अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ५ लाखांचं आर्थिक सहाय्य केले जाईल.



