अमरावती : मुलांना शिक्षण देणारे गुरुजी दारू पिऊन येतात. त्यामुळे मुलांचं शिक्षण धोक्यात येते. असे खळबळजनक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. ते दोन दिवस अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी धारणी तालुक्यातील कळमखार गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, “मेळघाटात अंधश्रद्धा पाहायला मिळाली, अनेक महिलांच्या गळ्यात काळे दोरे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. येथील महिला बाबाकडे जाऊन उपचार घेतात. तर मुलांना शिक्षण देणारे गुरुजी दारू पिऊन येतात. त्यामुळे मुलांचं शिक्षण धोक्यात येते असेही त्यांनी म्हटले आहे.
काय आहे हे प्रकरण……
अमरावती जिल्ह्यात शिक्षकी पेशाला अशोभनीय असा प्रकार घडला आहे. अमरावती येथील धारणी तालुक्यातील एका छोट्याशा गावात एक जिल्हापरिषद शिक्षक दारू पिऊन वर्गात झोपल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकरमल जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक दारू पिऊन दुपारी शाळेत आला. तसेच विद्यार्थ्यांसमोरच खुर्चीवर झोपी गेला. इतकेच नव्हे तर त्याने तिथेच लघुशंका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे.
दारूच्या धुंदीत असलेल्या या शिक्षकाला कशाचेच भान नव्हते. टेबलवर पाय पसरून तो झोपी गेला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची ही अवस्था बघून आपल्या पालकांना शाळेत बोलवून आणले. पालकांनी या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.



