मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीचं जोरदार कौतुक केलं. रविवारी (२१ ऑगस्ट) औरंगाबादमध्ये आपल्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये आणल्याचं वक्तव्य केलं. तसेच सावेंनी कामाचं पत्र दिलं की एकनाथ शिंदेही लगेच स्वाक्षरी करायचं असं नमूद केलं.
संजय शिरसाट म्हणाले, “मी अतुल सावे यांना सांगतो की आज तुम्ही मंत्री आहात. त्याचा शहराला किती उपयोग होईल हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. दर आठवड्याला, १५ दिवसांनी एक बैठक आणि झालेल्या कामाचा आढावा घेण्याचं काम आपलं असलं पाहिजे. अतुल सावे शहराचे नागरिक आहेत. ते महाराष्ट्राचे मंत्री असले तरी, या शहराचे नागरिक आहेत. त्यामुळे बोलावलेल्या प्रत्येक माणसाच्या घरी जाणं देखील त्याचं काम आहे. ते सर्व मंत्र्यांनीही केलं पाहिजे, अशी माझी भावना आहे.



