मुंबई, दि. २१ : फरार गँगस्टर आणि कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमचा तुरुंगात असलेला भाऊ इक्बाल कासकर याला छातीत दुखायला लागल्यामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
इक्बाल कासकर याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथेच त्याला अस्वस्थ वाटायला लागल्याने जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर हृदयरोग विभागामध्ये उपचार केले जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली इक्बाल कासकरला यावर्षी फेब्रुवारीमध्ये सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. त्याच्याविरोधात खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तेथूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.



