मुंबई : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेत गंभीररित्या भाजलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे देशमुख यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी आणि घोषणाबाजीने अधिवेशन चांगलच गाजत आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. काही गावांमध्ये जनावरं दगावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून विधानभवनात करण्यात आली आहे.



