ठाणे : सत्यानाश होवो तुमच्या दहीहंडीचा… तुम्ही सगळेजण उंचउंच थरांचं कौतुक करत होतात तेव्हा तुम्हाला मजा यावी म्हणून माझं बाळ सातव्या थरावर चढत होतं. तुमची दोन घटकांची मजा झाली आणि माझ्या बाळाचा जीव गेला! होय, गेलाय त्याचा जीव. सातव्या थरावरून खाली कोसळताना डोक्याला मार लागून माझ्या बाळाचा जीव गेलाय! तुमच्या गोविंदाने माझा बाळकृष्णच हिरावून नेलाय… आता कुठून आणू त्याला परत ? असा टाहो त्या मृत गोविंदाच्या आईने व्यक्त केला आहे.
तुमच्यासाठी असेल तो २४ वर्षांचा… माझ्यासाठी माझं बाळच होतं ते अजूनही. दहीहंडी फोडून येतो म्हणून गेला आणि आता ते कधीच परत येणार नाहीये… जायचीपण त्याला इतकी घाई होती की दोन घास खायलाही वेळ नव्हता त्याच्याकडे. बोलवायला आलेले बाकीचे गोविंदा दारात उभे होते म्हणे वाट बघत… पण त्यांचंही काही गेलं नाही आणि त्यांच्या कुणाच्या आयांचंही काही गेलं नाही… गेलं ते माझं… काय करायचीत तुमची ती लाखोंची बक्षिसं आणि तो थरार… त्याच्यामुळे माझं नांदतं गोकुळ कायमचं ओसाड झालंय… असा शब्दात त्या गोविंदाच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या.



