राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “देशमुखांना अटक करताना आधी त्यांच्यावर शिक्षण संस्थेसाठी १०० कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतरच्या आरोपपत्रांमध्ये ही रक्कम एक कोटी १० लाख रुपयांपर्यंत आली. तेवढ्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांना मागील १० महिन्यांपासून तुरुंगात डांबण्यात आलं,” असा घणाघाती आरोप शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला आहे.
शरद पवार म्हणाले, “सध्या देशात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सीबीआय, ईडी, आयटी या यंत्रणांशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ते एक मेहनती आणि ठाम भूमिका घेणारे गृहमंत्री होते. त्यांना अटक करण्यात आलं. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यात देशमुखांवर कुणातरी व्यक्तीकडून शिक्षण संस्थेसाठी १०० कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप करण्यात आला.
या आरोपांचा तपास झाला आणि एक महिन्याने नवं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यात ती रक्कम १०० कोटी रुपये नाही, तर चार कोटी रुपये होते असं सांगण्यात आलं. आरोपपत्र १०० वरून चार कोटींवर आलं. आता १५ दिवसांपूर्वी पुन्हा नवं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यात चार कोटी नाही, तर १ कोटी आणि १० लाख रुपये रक्कम असल्याचं सांगण्यात आलं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.



