औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१९ मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातील माहितीच्या तफावती संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याच प्रकरणात पुर्वी चौकशी करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी थातुरमातुर चौकशी करून सत्तार यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने नव्याने चौकशी करून ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलांची नावे आल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची संधी हुकते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हे सगळे आरोप सत्तार यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांचा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश झाला, त्यांना कृषी खात्याचे मंत्री करण्यात आले. परंतु आता पुन्हा चौकशीचा ससेमिरा मागे लागणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.



