औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट असा ‘सामना’ रंगताना पहायला मिळतोय. एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणं आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचं नाट्यही पाहायला मिळालं.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले आणि हे प्रोटोकॉलनुसार चुकीचं असल्याचं म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते. दरम्यान, बाजूलाच बसलेल्या एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून रोखलं आणि त्यानंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.



