बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलाने भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिहारमध्ये जेडीयू व भाजप युतीचे सरकार यामुळे कोलमडले. या राजकीय भूकंपानंतर नितीश कुमार राजदला सोबत घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये जनता दल, महाराष्ट्रात शिवसेना असे भाजपचे जुने सहकारी पक्ष सोडून गेल्याचे पाहायला मिळत असतानाच आता आणखी एक मित्रपक्ष याच वाटेवर असल्याची चिन्हं आहेत.
२०१४ विधानसभा निवडणुकांमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारमध्ये रासपला सत्तेचे वाटेकरी देखील करण्यात आले. मात्र गेल्या काही काळात भाजप रासपमध्ये दरी पडल्याचं पाहायला मिळतं आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून ही माहिती समोर आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील निवडणुकांपासून विधानसभा, लोकसभा निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केल्याचे समजते. यावर रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
महादेव जानकर ठाकरेंसोबत जाणार?
राज्यात सत्ताबदल झाला असून महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप- शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे. शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेनेत सध्या दोन गट पडल्याचं दिसतंय. एक गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे तर एका गटाने एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे.



