पुणे : राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची ओळख आहे. पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका अशी पुण्याची ओळख निर्माण झाली होती. पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पुणे शहरातील प्रश्न पाहता आता पुणे महापालिकेचं विभाजन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. चंद्रकांत पाटील हे सत्ताधारी भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. पाटील यांच्या या वक्तव्यामुळं पुणे शहरात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुण्यात काही वर्षांपूर्वी हडपसर महापालिकेची निर्मिती होणार का? अशा चर्चा सुरु होत्या त्या पुन्हा सुरु झाल्या आहेत.
पुण्याचं भौगोलिक क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त आहे. पुणे महापालिकेचे आता दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. जर क्षेत्र लहान असेल तिथं काम करणं सोपं, असतं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी गोवा राज्याचा दाखला दिला. पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र पाहता दोन महापालिका होण्याची आवश्यकता असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.



