मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीने या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रावसाहेब दानवे यांनी, आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार आहोत. आता अशोक चव्हाण यांची चर्चा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली होती. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, असे दानवे यांनी म्हटलं आहे.
आज भाजपला कोणाची गरज नाही. कोणी इतर पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आलं तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावं. ही वैचारिक लढाई आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.



