मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिन्ही बाजूंनी घेरण्याची व्यूहरचना भाजपने आखली जात आहे. शिवसेने विरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसेचं तिहेरी आव्हान उभं केलं जातं आहे. एकीकडं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या हक्काची मराठी मतं फोडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गट आणि मनसेची युती जुळवून आणली जातेय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्या आणि गप्पा मारल्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली जहाल हिंदुत्वाची भूमिका भाजपच्या विचारधारेशी जुळणारी आहे. मात्र, मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतांचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळं तूर्तास शिंदे गट आणि मनसेची मनं जुळवून आणण्याची प्रक्रिया करत असून स्वतः स्वबळाणे निवडणुका लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप मित्रपक्ष असा थेट सामना झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. याकरिता शिवसेनेविरोधात शिंदे गट आणि मनसेची युती घडवून आणल्यास मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं. राज ठाकरेंसारखा आक्रमक चेहरा सोबतीला घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो, अशी कुजबूज शिंदे गटात आहे. आणि तसे न झाल्यास शिवसेनेची मतांची विभागणी होऊन भाजपचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील आणि भाजप मुंबई महापालिकेत पूर्ण बहुमताने येईल. असा प्लॅन भाजपच्या केंद्रीय गोटातून तयार झाला असल्याची चर्चा सध्या मुंबईत सुरू झाली आहे.
गेल्या 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. मुंबई आणि ठाकरे यांचं समीकरण अतिशय जिव्हाळ्याचं व घट्ट आहे. त्यामुळे शिवसेनेला आणि ठाकरेंना हरवायचं असेल तर तेवढाच तगडा पर्याय उभा करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची शिवसेना खिळखिळी केली आहे. आता राज ठाकरेंच्या रूपानं ठाकरे विरुद्ध ठाकरे लढा उभारून शिवसेनेच्या वर्मावर मोठा घाव घालण्याचा मास्टर प्लॅन भाजपनं आखला आहे. त्यामुळे सामान्य मराठी शिवसैनिकांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे.



